संपादकीय उकिरडे……
संपादकीय उकिरडे
‘शैक्षणिक उकिरडे’ हे ‘लोकसत्ता’चे संपादकीय (४ एप्रिल) वाचले. मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्रातील इतर अनेक विद्यापीठांसह संपूर्ण शिक्षण क्षेत्रात अनिष्ट प्रवृत्तींचा फैलाव होऊन जी बजबजपुरी माजली आहे त्यावर प्रकाशझोत टाकण्याचा आपला प्रयत्न स्तुत्य आहे. मात्र सदर संपादकीयात विनाकारण माझे नाव घेऊन माझ्या कार्यसिद्धीबद्दल विशेषत: पुणे विद्यापीठातील कामगिरीबद्दल आपण धादांत खोटी आणि दिशाभूल करणारी जी विधाने केली आहेत त्याला माझा तीव्र आक्षेप आहे. हा आक्षेप नोंदविण्यासाठी हे पत्र!
१) ‘सुमार दर्जाच्या माणसांकडे महत्त्वाच्या संस्था गेल्या की जे काही होते ते ते महाराष्ट्रातील विद्यापीठांत सध्या सुरू आहे’, अशी सुरुवात करून त्या संपादकीयात चलाखीने माझे नाव गोवून माझ्या आजवरच्या कामगिरीचा दर्जा सुमार आहे, असे अप्रत्यक्षपणे सूचित करण्यात आले आहे.
- माझ्या आजवरच्या कामगिरीबद्दल मी स्वत:च बोलणे औचित्याला धरून होणार नाही. मात्र इतर सर्वमान्य आदरणीय व्यक्तींनी माझ्याबद्दल काय भावना व्यक्त केली आहे ती विचारात घेणे योग्य ठरेल. ज्यांच्याबरोबर मी गेली २५ वष्रे सातत्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या काम करतो आहे, ते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सन २००५ मध्ये आपल्या जाहीर भाषणात म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन् यांच्याप्रमाणे डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य हीसुद्धा बदलाची, असीम शौर्याची आणि आशेची कहाणी आहे.’ डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारखी महनीय व्यक्ती, डॉ. नरेंद्र जाधव हे लक्षावधी तरुणांचे आदर्श (रोल मॉडेल) आहेत असे म्हणत असताना जाधव सुमार दर्जाचे आहेत, असे आपण सूचित करणे कितपत विश्वासार्ह मानता येईल?
२) राजकीय नेत्यांच्या कार्यालयात केविलवाणे हसत अनेक संभाव्य वा माजी कुलगुरू असतात हे विधान दुर्दैवाने खरे आहे. मात्र या संदर्भात ‘बोलकी उदाहरणे’ म्हणून संपादकीयमध्ये दोन नावे घेतली आहेत : पहिले डॉ. मुणगेकरांचे व नंतर माझे. या ‘श्रेयनामावली’मध्ये माझे नाव येते हे धक्कादायक आहे.
डॉ. मुणगेकरांच्या बाबतीत मी बोलणार नाही, पण माझ्या स्वत:च्या बाबतीत मी ठामपणे सांगू शकतो की, माझं आजवरचं करिअर हे बंद्या रुपयाप्रमाणे खणखणीत आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांशी माझे सौहार्दाचे संबंध आहेत, परंतु कोणत्याही राजकीय नेत्याचा मी िमधा नाही, नव्हतो आणि कधीही राहणार नाही. मला ओळखणारी कुठलीही व्यक्ती हे तुम्हाला सांगू शकेल.
३) कुलगुरूपदावरून केलेल्या कामगिरीबद्दल बोलताना संपादक मला आणि डॉ.मुणगेकरांना एकाच मापाने तोलतात, ते का म्हणून? आमच्या दोघांची जात एकच आहे म्हणून? माझी आणि माझ्यापेक्षा वयाने सहा-सात वर्षांनी मोठे असलेल्या डॉ. मुणगेकरांची कार्यशैली पूर्णत: भिन्न आहे. आजवर कुठल्याही राजकीय नेत्यांसमोर मला कुठल्याही पदासाठी कधीही याचना करावी लागलेली नाही.
४) संपादकीय म्हणते: ‘काहींना कुलगुरूपदाच्या पलीकडे काही राजकीय भुका असतात’. मी म्हणतो, का असू नयेत? कठोर परिश्रमातून योग्यता प्राप्त केली असेल तर मोठय़ा पदाची मनीषा बाळगण्यात काय गर आहे? माझ्या बापाने मला सांगितले की, ‘टापला जायला पायजे.’ त्यासाठी मी सर्वतोपरी आणि अखंडपणे प्रयत्नशील राहणारच! तिथे तुमच्या मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे? तुम्ही म्हणता : डॉ. जाधव यांची राजकीय मनीषा लपून राहिलेली नाही. यात तुम्ही एखादे गुपित सांगितल्याचा आव काय आणताय, राव? गेल्या वर्षी पुण्याच्या एका कार्यक्रमात मी जाहीरपणे म्हटले : मी जर निवडणूक लढविली तर ती पुण्यातूनच लढविणार. माझी महत्त्वाकांक्षा मी मुळातच लपवून ठेवलेली नाही, मग ती लपून कशी राहणार?
५) संपादकीयात एक विधान तर भयंकरच आहे. (जाधवांच्या राजकीय सिद्धीबद्दल) – ‘विलंब लागतो आहे तो केवळ बारामतीतून काही आवतण येण्याचा.’ मी शपथेवर सांगू शकेन की, माझ्याबाबत इतके मूर्खपणाचे विधान आजवर कोणीही केलेले नव्हते. साधा कॉमन सेन्स आहे. ज्या नरेंद्र जाधवांना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्याच्या उप-मुख्यमंत्रीपदाचा दर्जा दिलेला आहे; ज्या नरेंद्र जाधवांचा समावेश राष्ट्रीय सल्लागार परिषदेमध्ये श्रीमती सोनिया गांधी यांनी सन्मानपूर्वक केलेला आहे आणि डॉ. मनमोहन सिंग व श्रीमती गांधी यांच्यासमवेत एकाच वेळी काम करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे लोक आपल्या देशात आज आहेत त्यामध्ये ज्या नरेंद्र जाधवांचा समावेश होतो, त्यांना बारामतीच्या आवतणाची वाट पाहण्याची गरजच काय?
यामागे लोकांच्या मनात संशय निर्माण होईल असे विष कालविण्याचा अत्यंत धूर्त प्रयत्न आहे. त्यामधून सूचित असे होते की, नरेंद्र जाधवांनी आजपर्यंत जे साध्य केले आहे ते केवळ बारामतीच्या कृपाप्रसादाने!
मी सदैव फर्स्ट क्लास विद्यार्थी होतो, गुणांचा उच्चांक करीत अमेरिकेतल्या मान्यवर विद्यापीठाकडून मी डॉक्टरेट मिळवली, असंख्य प्रलोभनं दूर सारून मायदेशाची सेवा करण्यासाठी मी भारतात लगेचच परतलो. रिझव्र्ह बँकेमध्ये (सर्वानुमते) असामान्य कामगिरी केली, आजवर एकूण १६ ग्रंथ लिहिले (त्यातल्या अनेकांनी तर इतिहास घडविला), केंद्र सरकार व राज्य सरकारचे तब्बल २५ अहवाल तयार केले, शंभराहून अधिक शोधनिबंध लिहिले, पन्नासपेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले. (त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कारापासून फ्रेंच सरकारच्या ‘कमांडर’ या सर्वोच्च नागरी सन्मानाचा समावेश होतो. हा पुरस्कार मिळवणारा मी पहिला भारतीय ठरलो.) माझ्या कार्यसिद्धीची जंत्री याहून खूप मोठी आहे, परंतु विस्तारभयास्तव ती मी इथे देऊ शकत नाही. (तुम्हाला माझ्या वेबसाइटवर पाहायला मिळू शकेल). यापकी नेमक्या कोणत्या कार्यसिद्धी माननीय शरद पवार यांच्यामुळे मिळाल्या आहेत, ते जरा सांगता काय?
६) संपादकीय असेही म्हणते : मी कुलगुरू असताना पुणे विद्यापीठाचे काही भले झाले नाही. ‘प्रसिद्धीचा झोत आपल्या अंगावर राहील याची (मुणगेकर आणि जाधव) यांनी सतत काळजी घेतली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले.’
गेल्या काही वर्षांत मुंबई विद्यापीठाची रया पार गेलेली आहे, हे जगजाहीर आहे. मुंबई विद्यापीठाच्या गेल्या अनेक वर्षांतील अधोगतीला डॉ. मुणगेकरांसह अनेक कुलगुरू जबाबदार आहेत, हा तुमचा दावादेखील मान्य होण्यासारखा आहे. मात्र त्या शैक्षणिक उकिरडय़ाबरोबर तुम्ही पुणे विद्यापीठाचा समावेश करता हे साफ चूक आहे. माझ्या कुलगुरूपदाच्या कार्यकालामध्ये पुणे विद्यापीठाचे भले झाले नाही, हे तुमचे विधान संपूर्णतया खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.
पुणे विद्यापीठात कुलगुरू म्हणून माझी नेमणूक झाली ती राजकीय खटपटी लटपटी केल्यामुळे नव्हे. श्री. राम प्रधान यांच्या शोधसमितीने सन्मानपूर्वक त्यासाठी मला बोलावून घेतले. त्या वेळी अफगाणिस्तानातील वर्षांला सव्वा कोटी रुपयांची नोकरी सोडून पुणे विद्यापीठाची वर्षांला पाच लाख रुपयांची नोकरी मी स्वीकारली ती सामाजिक उत्तरदायित्व म्हणून. अजगरासारख्या सुस्त झालेल्या नि अकार्यक्षम झालेल्या पुणे विद्यापीठाच्या कारभारात उणापुऱ्या तीन वर्षांत मी नवसंजीवनी ओतली; त्यात शिस्त आणली व कार्यक्षमता सुधारली. मी कुलगुरू असताना घेतलेल्या निर्णयांचा मला सार्थ अभिमान आहे. उदा.- ४८४ अभ्यासक्रमांचे पुनल्रेखन, महाविद्यालयीन स्तरावर संशोधनाला चालना, कमवा-शिका योजनेत आमूलाग्र बदल, मुख्य इमारतीसह अनेक इमारतींचे बांधकाम, भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई, ट्रिपल कनेक्टिव्हिटी, विद्यापीठ वसतिगृहातील समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक लक्ष व त्यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद. एवढेच नव्हे तर पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सामाजिक बांधीलकीसाठी सक्रिय करण्यासाठी समर्थ भारत अभियान. माझ्या या अपूर्व कामगिरीची साक्ष पुणे विद्यापीठातील हजारो शिक्षक आणि लाखो विद्यार्थी देऊ शकतील. पण ते पडताळून पाहण्याची तसदी तुमच्या कलुषित मनाने घेतलेली दिसत नाही.
नरेंद्र जाधव, नवी दिल्ली
Response to Article Published in Loksatta on 4th April 2012 at http://epaper.loksatta.com/31767/loksatta-pune/04-04-2012#page/7/2
Narendra Jadhav's Blog
- Narendra Jadhav's profile
- 56 followers
